राम शिंदेंच्या वक्तव्याची शिवसेनेकडून अंमलबजावणी, गाय-बैल घेऊन भाजप कार्यालयात

Foto

औरंगाबाद- दुष्काळात जनावर नातेवाईकांकडे नेऊन सोडा या भाजप नेते आणि राज्याचे मंत्री राम शिंदे यांच्या वक्तव्याची शिवसेनेकडून औरंगाबादेत अंमलबजावणी करण्यात आली.  शिवसेनेचे सख्खे शेजारी असलेल्या भाजपच्या कार्यालयात शिवसैनिक गुराढोरांसह निघाले, मात्र कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल म्हणून पोलिसांनी जिल्हाप्रमुख अंबादास दानवेंसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र या अनोख्या आंदोलनाने प्रशासनाची तारांबळ उडाली.  

काय म्हणाले होते राम शिंदे

चारा छावणी सुरु करण्याची मागणी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यांना राज्याचे मंत्री राम शिंदे यांनी दुष्काळात गुरु ढोरे नातेवाईक किंवा शेतकऱ्यांकडे नेऊन सोडण्याचा सल्ला दिला होता. जबाबदार मंत्र्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ संपूर्ण राज्यात पसरला. त्यांच्या या सल्ल्याचा निषेध शेतकऱ्यांसह विविध राजकीय पक्षांनीही केला.

सख्खे शेजारी आले गुरे ढोरे घेऊन

राज्यात आणि केंद्रात शिवसेना भाजप युतीची सत्ता आहे. मात्र शिवसेना ही कायम विरोधी पक्षाचीच भूमिका निभावत आली आहे. भाजप मंत्र्यांनी शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यानंतर त्याचा सर्वप्रथम निषेध शिवसेनेने औरंगाबादेत केला आहे. याबाबत सांगताना शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे म्हणाले की, केंद्रीय पथकाचा अहमदनगर जिल्ह्यात दौरा असताना, शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे मांडल्या. यावर मंत्री महोदयांनी ‘चारापाणी नसेल तर जनावरे पाहुण्याच्या दावणीला बांधा’ अशी शेतकऱ्यांची चेष्टा केली. आणि स्वत:च्या वाक्यावर कार्यकर्त्यांसोबत हसत राहीले. शिंदे यांच्या या कृत्याचा निषेध करण्यासाठी जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या कार्यालयापासून जनावरे सोबत घेत शिवसैनिकांनी भाजप कार्यालयाकडे चाल केली. परंतु, त्यांना पोलिसांनी क्रांतिचौकातच अडवत ताब्यात घेतले. शिवसैनिकांना क्रांती चौक पोलिस स्टेशनमध्ये ठेवण्यात आले. शेतकरी दुष्काळाने आधीच हवाल दिल झाला आहे. शेतकऱ्यांना चारा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे, त्याची अशी चेष्टा एका मंत्र्याने करणे योग्य नसल्याचेही दानवे यावेळी म्हणाले. यावेळी जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, नगरसेवक मनोज गांगवे, कृष्णा पाटील डोनागवकर, माजी नगरसेवक अनिल जैस्वाल, गोपाळ कुलकर्णी, ज्ञानेश्वर डांगे, दिग्विजय शेरखाने यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.